इलेक्ट्रॉनिकच्या या वस्तूंच्या किमतीत होणार बदल, जाणून घ्या

buisness batmya
नवी दिल्लीः केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कस्टम ड्युटीमध्ये बदल जाहीर केले होते. त्यामुळे आता केलेल्या बदलानुसार स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, हेडफोन, इअरबड्सच्या किमतीत बदल होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून हा बदल देशभरात लागू होणार असून, या परिस्थितीत स्मार्टफोनसह कोणत्या डिव्हाईसेसच्या किंमती किती वाढणार आहेत ते जाणून घेऊया.
मोबाईल फोन चार्जरचे ट्रान्सफॉर्मर पार्ट्स, मोबाईल कॅमेरा मॉड्यूल्सच्या कॅमेरा लेन्सेस आणि इतर उपकरणांवर सरकारने 5 ते 12.5 टक्क्यांपर्यंत कस्टम ड्यूटी सूट दिली आहे. त्यामुळे स्मार्टफोन बनवण्याचा खर्च कमी होणार असून, स्मार्टफोन कंपन्या स्मार्टफोनची किंमत कमी करू शकतात,अशी अपेक्षा आहे. तसेच सरकारने स्मार्टवॉच उत्पादकांना 31 मार्च 2023 पर्यंत कस्टम ड्युटीमधून सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 1 एप्रिलनंतर देशातील स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडच्या किमतीतही घसरण पाहायला मिळू शकते.
तसेच सरकारने इअरबड्स निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्या भागांच्या आयातीवर शुल्क वाढवले असल्यामुळे 1 एप्रिलपासून इअरबड्सच्या उत्पादन किंमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे या परिस्थितीत युजर्सना वायरलेस इअरबड्स, नेकबँड हेडफोनसाठी अधिक पैसे द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकारने आता हेडफोन्सच्या थेट आयातीवर 20 टक्के अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. म्हणून हा नियम 1 एप्रिलपासून देशभरात लागू करण्यात येत असल्याने युजर्सना आयात केलेल्या हेडफोनसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. मात्र, दुसरीकडे देशात बनवलेल्या हेडफोन्सची मागणी वाढताना दिसत आहे.
दरम्यान 2022 च्या अर्थसंकल्पात, सरकारने रेफ्रिजरेटर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या कंप्रेसर आणि त्याच्या भागांवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. ती आता 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. म्हणूनच 1 एप्रिलपासून रेफ्रिजरेटर उत्पादक देशातील रेफ्रिजरेटरच्या किमती वाढणार असा अंदाज आहे.