केंद्रीय कर्मचा-यांना आनंदाची बातमी,कर्माचऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
buisness batmya
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर दिली आहे. केंद्रीय कर्माचऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाला आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तसेच याचबरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर गेला आहे.
दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा तब्बल ४७.६८ लाख कर्मचाऱ्यांना आणि ६८.६२ लाख पेश्नन धारकांना होणार आहे. तसेच या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर प्रत्येक वर्षी ९५४४.५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए जानेवारी ते जुलै दरम्यान वर्षातून दोनदा अपडेट केला जात असतो. त्यामुळे महागाई भत्त्याची गणना ही सध्या असणा-या महागाई भत्त्याच्या दराला मूळ वेतनासह गुणाकार करून केली जात असते. त्यातूनच सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी व पेन्शनधारकांना डीए दिला जातो.
गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच आता महागाई भत्त्यात वाढ झाल्याने महागाईच्या या दिवसांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच मागच्या वर्षी जुलै महिन्यात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए १७ टक्क्यांवरून थेट २८ टक्के केला होता. त्यात ऑक्टोबरमध्ये पुन्हा तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली. आणि हाच महागाई भत्ता आता ३४ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढल्यानंतर १८,००० रुपयांच्या मूळ पगारावर ६१२० रुपयांची वाढ प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणार आहे.तसेच कमाल वेतन स्लॅबमधील कर्मचाऱ्यांचा डीए वाढवून १९,३४६ रुपये प्रति महिना होणार आहे.