गौतमी पाटील पुढे अभिनेत्रीही फिक्या, एका कार्यक्रमाचे किती पैसे?

मुबई : घायाळ करणाऱ्या अदा आणि ठुमके, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची हातोटी आणि वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत साधेपणाची राहणी यामुळे प्रसिद्ध नृत्यांगणा अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. कधी काळी ऑर्केस्ट्रात अदाकारा म्हणून काम करणारी… बॅकस्टेज असलेली गौतमी पाटील आज सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे.
एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. कारण गौतमी पाटील आणि कार्यक्रम यशस्वी होणारच हे समीकरण झालं आहे. त्यामुळे गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते.
काही वेळा तर तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी लाठीमारही करावा लागतो. यावरून गौतमीची क्रेझ किती प्रचंड आहे हे दिसून येतं.
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या तारखा जशा मिळणं मुश्किल आहे, तसंच काहीसं गौतमी पाटीलचं आहे. गौतमी पाटीलच्याही तारखा मिळणं मुश्किल असतं. कारण तिच्या महिन्याच्या सर्व तारखा बुक असतात. कार्यक्रमाच्या घेता येईल तेवढ्या सुपाऱ्या कमीच असतात. लोकांची प्रचंड मागणी आणि तारखाच नसल्याने गौतमी पाटीलला आपल्या गावात कार्यक्रमाला आणण्यासाठी सांगेल तितकं मानधन द्यायला लोक तयार असतात. पण तरीही तारखाच शिल्लक नसतात त्यामुळे गौतमीला अनेक कार्यक्रमांच्या तारखा पुढच्या महिन्याच्या द्यावा लागत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या जिल्ह्यात जास्त कार्यक्रम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमी सध्या एका कार्यक्रमाचे दीड ते 2 लाख रुपये मानधन घेते. तिचा दहा बारा जणांचा लवाजमा असतो. या सर्वांमध्ये मानधनाचं वाटप केल्यानंतरही गौतमी महिन्याला 30 ते 35 लाख रुपये सहज कमावते. एखाद्या सिनेमात काम करणाऱ्या नटीच्या तोडीस तोड गौतमीची कमाई आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमांना ग्रामीण भागात अधिक डिमांड आहे. त्यातही तिने कोल्हापूर आणि पुण्यात सर्वाधिक कार्यक्रम केले आहेत. गौतमी खानदेशातील असूनही पुणे आणि कोल्हापुरात तिचा चाहता वर्ग अधिक आहे हे विशेष.



